नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा):-एकीकडे भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा चिंताजनकरित्या वाढायला लागलेली असतानाच आता आणखी एका विषाणूच्या संसर्गाची चाहूल देशात लागली आहे. अर्थात ही चाहूल अजिबातच सकारात्मक नाही. केरळमध्ये रोटा व्हायरसप्रमाणेच लक्षणं असणार्या या नव्या विषाणूची लागण केरळातील दोन लहान मुलांना झाली आहे.

राज्यातील आरोग्य विभागानं या प्रकरणांची माहिती घेत तात्काळ काही पावलं उचलली आहेत. प्रदूषित पाणी आणि अन्नपदार्थांच्या माध्यमातून या नोरोव्हायरस विषाणूचा संसर्ग होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सध्या विषाणूची लागण झालेल्या दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी वृत्तसंस्थेला दिली. मुलांना झालेला संसर्ग तेव्हा उघडकीस आला, जेव्हा सरकारी प्रयोगशाळेत त्याच्यावर अन्नातून झालेल्या विषबाधेची चाचणी करण्यात आली होती. नोरोव्हायरसचा संसर्ग अगदी कुणालाही होऊ शकतो. कारण, या विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण अधिक आहे. उलट्या आणि अतिसार ही या विषाणूच्या संसर्गाची प्राथमिक लक्षणं आहेत.

नोरोव्हायरसचा संसर्ग कसा ओळखाल?
नोरोव्हायरसचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही आल्यास तुम्हालाही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. प्रदूषित पाणी आणि अन्न ग्रहण केल्यास या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. प्रदूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर हात न धुता अनावधानानं तेच हात तोंडात घातल्यासही हा विषाणू तुमच्या शरीरात शिरकाव करु शकतो.