नांदेड :- आज (दि.१५) लग्न मात्र वधूच्या गावातील रस्ते पुराच्या पाण्याने वेढलेले. या परिस्थितीत जीवाची बाजी लावत नियोजित वराने अनोखी शक्कल लढवत वधूचे गाव गाठलेच.

वधूच्या गावात पोहोचण्यासाठी नवरदेवाने चक्क थर्मोकॉल वरून 7 किलोमीटरचा धोकादायक प्रवास केला. नांदेड जिल्ह्यात पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले ओसांडून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. वाहतुकही बंद आहे.

हदगाव तालुक्यातील करोडी येथील शहाजी माधव राकडे यांचा विवाह नात्यातीलच उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथील गायत्री बालाजी गोंडाडे हिच्याशी ठरला होता. काल सकाळी वधुकडे टिळा कुंकु पानवट्याचा आणि रात्री हळदीचा कार्यक्रम होता.
वधूच्या संगमचिंचोली या गावाला पुराच्या पाण्याचा विळखा असल्याने पोहचायचे कसे असा प्रश्न वराला भेडसावत होता. पण काही करून लग्नाला पोहचायचे असा निश्चय त्याने केलेला होता.
नवरदेवाने चक्क थर्मोकॉलच्या एका बॉक्स वरून 7 किलोमिटर अंतर कापत वधूच्या गावात सुखरूप पोहोचला. त्याच्यासोबत त्याचे काही नातेवाईक असेच थर्मोकॉल वरून प्रवास करत पोहोचले. गुरुवारी टिळ्याचा, कुंकू पानवाट्याचा कार्यक्रम संपन्न झाला.