नाशिक (चंद्रशेखर गोसावी) : शहरातील सिडको परिसरातील सावतानगर येथे पहाटे बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचे वनविभागाकडून रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे.
नाशिक शहरात आतापर्यंत जास्त करून मळे व लगतच्या परिसरात असलेल्या नागरी वस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन होत होते. परंतु आता बिबट्या नाशिक शहरातील नागरी वस्तीमध्ये देखील आढळून येऊ लागला आहे. आत्तापर्यंत नाशिक शहरात सातपूर तसेच नाशिकरोड परिसरामध्ये असलेल्या नागरी वस्तीमध्ये बिबट्या दिसला होता.
आज बिबट्या सिडको सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी देखील आढळून आला आहे. शिवसेना (उबाठा गट) महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सावतानगर येथील संपर्क कार्यालयाजवळील सूर्योदय कॉलनी मध्ये बिबट्या आढळून आला. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला. सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर तातडीने याची माहिती सुधाकर बडगुजर यांना नागरिकांनी फोनवरून दिली. त्यांनी तातडीने ही माहिती वनविभाग आणि अंबड पोलिसांना कळविली. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच वनविभागाची रात्रीच्या वेळी असणारी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.
या परिसरातील नागरिकांना बिबट्या आल्याचे कळाल्यानंतर या परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने परिसरातील नागरिकांनी या परिसरात गर्दी केली.तसेच सिडको परिसरातील नागरिक या ठिकाणी जमा झाले घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त वाढवला.
सावतानगर नंतर बिबट्याने सीजीएसटी विभागाच्या परिसरात धुम ठोकली. तेथून त्याचे रेस्क्यु करण्याचे काम वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.
सावता नगर परिसरामध्ये बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाच्या अधिकारी वृषाली गाडे व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना कळविले. या परिसरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आणि तातडीने पावले उचलण्यात आली. या परिसरामध्ये बिबट्याच्या भीतीचे वातावरण असले तरीही नागरिक मात्र पूर्ण खबरदारी घेत आहेत, असे बडगुजर यांनी सांगितले.