महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान! राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान! राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
img
DB
विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने  सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे.

यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अभिनयातील सहजता, टायमिंग आणि विविध भावछटांचे सशक्त सादरीकरण या बाबींसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. अशोक सराफ यांचे ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुम धडाका’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ आणि ‘पंढरीची वारी’ यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर करून आहेत. अशोक सराफ यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी देखील केले होते.
 
त्याचबरोबर डॉ. मनोहर जोशी यांना पद्मभूषण (मरणोत्तर), कॅलिग्राफर अच्युत पालव, जयपुर-अतरौली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा, 70 वर्षीय डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘पद्म पुरस्कारां’ ने आज सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते आज दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण व केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या पुरस्कार समारंभात राज्यातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group