वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचे निर्देश दिल्यानंतर NBE ने परिक्षा पुढे ढकल्याची विनंती केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. त्यात सुप्रीम कोर्टाने या परीक्षा 3 ऑगस्ट रोजी घेण्यास मान्यता दिली आहे.
त्यानुसात आता या परीक्षा एकाच टप्प्यात होणार आहेत. यापूर्वी ही परीक्षा 15 जून रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार होती. मात्र, या परीक्षा दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
त्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षा 3 ऑगस्ट रोजी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्याने प्रश्नांच्या काठिण्य पातळीत फरक होऊ शकतो, ज्यामुळे असमानता आणि मनमानी निर्माण होईल असे निरीक्षणदेखील न्यायालयाने सुनावणीवेळी नोंदवले.
कोणत्याही दोन प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी कधीही पूर्णपणे सारखीच म्हणता येणार नाही. त्यामुळे एकसमान मानके सुनिश्चित करण्यासाठी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीवेळी नोंदवत परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचे निर्देश दिले होते.
वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी दिलासा
नीट पीजी परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याच्या निर्णयामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण आता त्यांना इतर कोणत्याही शिफ्टच्या कठीण किंवा सोप्या पेपर्सची चिंता करावी लागणार नाही. सर्व उमेदवार एकाच वेळी समान प्रश्नांसह परीक्षा देतील, ज्यामुळे निकालांची निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे. नीट पीजीच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतल्याने पारदर्शकता राहील आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल, असही कोर्टाने म्हटलं आहे.