नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील सिटी लिंक बससेवा आज सकाळपासून कर्मचाऱ्यांनी पुन्हा काम बंद आंदोलन पुकारल्याने ठप्प झाली आहे. दिवाळी बोनस तसेच प्रलंबित वेतन या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे अनेक बसेस रद्द कराव्या लागल्या.
दरम्यान नाशिकरोड बस स्थानकातून काही प्रमाणात सिटीलिंकची सेवा मात्र सुरू आहे. महानगरपालिकेकडून ठेकेदाराला आवश्यक ते वेतन दिले जाते. मात्र कर्मचाऱ्यांचा पीएफ, ईएसआय आणि अन्य देणे शासन दरबारी जमा केल्याच्या पावत्या न मिळाल्यामुळे त्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन प्रलंबित आहे, असे वाहकांनी सांगितले.
शहरातील तपोवन मार्गे बिटको, द्वारका, शालिमार, सीबीएस, पंचवटी. नाशिकरोड ते निमाणीमार्गे जेलरोड टाकी, सैलानी बाबा, नांदूरगाव, नांदूरनाका, तपोवन. नाशिकरोड ते अंबडगावमार्गे द्वारका, महामार्ग, लेखानगर, गरवारे, नाशिकरोड ते बारदानफाटामार्गे द्वारका, कॉलेज रोड, सातपूर, व्हीआयपी, कार्बननाका. तपोवन ते बारदान फाटामार्गे सिव्हील, सातपूर अशोकनगर, श्रमिकनगर, तपोवन ते पाथर्डी गावमार्गे द्वारका, नागजी, इंदिरानगर, वनवैभव, सिम्बॉयसिस कॉलेज ते बोरगडमार्गे शिवाजी चौक, लेखानगर, महामार्ग, म्हसरूळ बोरगड, तपोवन सिम्बॉयसिस कॉलेजमार्गे पवननगर, उत्तमनगर, तपोवन ते भगूरमार्गे शालिमार, द्वारका, बिटको, देवळाली कॅम्प या बसेस बंद झाल्या आहेत.
नाशिक सिटी लिंक बस शहर बससेवा गेल्या दोन वर्षांपासून शहरात कार्यरत आहे. सिटीलिंक शहर बस सेवेसाठी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या वाहकांनी अचानक आंदोलन केले. शहरातील सिटीलिंक बस सेवेच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तपोवन बस डेपोत हे काम बंद आंदोलन करण्यात आले. दर दोन महिन्यांनी वेतनाच्या कारणावरुन वारंवार संप पुकारण्यात येत असल्याने नाशिककरांची यात मोठी गैरसोय होते.
सिटी लिंक शहर बससेवेच्या कर्मचाऱ्यांचा एक महिन्यांपासून पगार थकलेला असून या पार्श्वभूमीवर त्यांनी संप पुकारला असून वेळेवर पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून कामबंद आंदोलन केले. त्यामुळे शहर बससेवेच्या बोजवारा उडाला होता. अचानक झालेल्या या संपामुळे कामावर जाणारे, क्लासला जाणारे विद्यार्थी, नागरिक आदींचा खोळंबा होऊन हाल झाले. नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागला.
नाशिक महानगर परिवहन महामंडळाने जुलै 2021 पासून 'सिटीलिंक बससेवा सुरू केली आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वाहक आणि चालक वारंवार काम बंद आंदोलन करतात. आज देखील वाहकांनी अचानकपणे सकाळपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळावे, बोनस मिळवा, तसेच अकरा महिन्याचा पीएफ जमा करावा या मागणीसाठी आंदोलन सुरू असून त्यामुळे तपोवन येथील सिटी लिंक बस आगारात सुमारे 250 बस उभ्या आहेत, आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहिल असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
नाशिकमध्ये शिवमहापुराण सुरू असून, तेथेही सिटी लिंकच्या माध्यमातून नागरिकांना पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या आंदोलनामुळे आता भाविकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.