बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक प्रवासी जखमी झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नारिंगरे येथे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा जागीच चुराडा झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक प्रवासी थोडक्यात बचावला आहे. हा प्रवासी जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिक्षातून प्रवास करणारे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे.
देवगड तालुक्यातील नारिंगरे येथे एसटी बस आणि रिक्षा यांच्यात जोराची धडक झाली. विजयदुर्ग मालवण येथून बस नारिंगरे येथे येत असताना हा अपघात झाला. रिक्षाचालकाचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा एसटीला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा चुराडा झाला . घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.