ताजमहालाच्या पश्चिम गेट परिसरात असलेल्या पार्किंगजवळ यलो झोन बॅरिअर परिसरात सोमवारी फायरिंगची घटना घडली होती, ज्या व्यक्तीनं फायरिंग केली तो भाजपचा नेता असल्याची माहिती आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पंकज कुमार सिंह असं या व्यक्तीचं नाव असून, तो एलआयसी एजेंट देखील आहे. पोलिसांनी या प्रकरणात पंकज कुमार सिंह याला बेड्या ठोकल्या असून, त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे.
पंकज कुमार सिंह याने ताजमहालाच्या परिसरात फायरिंग केली, त्यानंतर पोलिसांची नजर चकून त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता, तेव्हापासून पोलीस आरोपीच्या मागावर होते, अखेर पंकज कुमार सिंह याला अटक करण्यात आली आहे.
लखनऊ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, त्यानंतर त्याला आगरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून परवाना असलेली बंदूक आणि तीन काडतुसं जप्त केली आहेत. फायरिंग का केली याबाबत पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली तर त्याने पोलिसांना सांगितलं की, माझ्या मनाला वाटलं म्हणून मी फायरिंग केली.
काय आहे नेमकं प्रकरण?
आरोपी पंकज कुमार सिंह हा आपल्या कारनं ताजमहालाच्या पश्चिम गेटवर सोमवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास पोहोचला. आजमगढच्या बलरामपूर येथील रहिवासी असलेल्या पंकज कुमार याने आपण सरकारी अधिकारी असल्याचं सांगून ताजमहालाच्या गेटपर्यंत गाडी जाऊ द्या असं तेथील व्यवस्थापनाला म्हटलं. मात्र पोलिसांनी त्याला तिथून परत पाठवलं. त्यानंतर पंकज कुमार सिंह यांने आपल्या परवाना असलेल्या बंदुकीमधून तीन राऊंड फायर केले, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
आरोपी फायरिंग करून घटनास्थळावरून फरार झाला, पोलीस आरोपीच्या मागावर होते. अखेर लखनऊ पोलिसांनी पंकज कुमार सिंह याला अटक केलं, त्याला आगरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.