शिक्षण मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. रिपोर्टनुसार इयत्ता तिसरीतील फक्त 55 टक्के विद्यार्थीच 99 पर्यंतची संख्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहू शकतात.
सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेचं आकलन करण्यासाठी राष्ट्रीय सर्वेक्षण मागील वर्षात 4 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यामध्ये 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 781 जिल्ह्यांतील 74 हजार 229 शाळांचा समावेश होता.
या शाळांतील इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीच्या सरकारी आणि खासगी शाळांतील 21 लाख 15 हजार 22 विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले होते.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , या सर्वेनुसार या तिन्ही वर्गांतील 1 लाख 15 हजार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. 2 लाख 70 हजार 424 शिक्षक आणि शाळा प्रमुखांनी प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून उत्तरे दिली.
रिपोर्टनुसार इयत्ता तिसरीतील फक्त 55 टक्के विद्यार्थ्यांना 99 पर्यंतची संख्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहिता येत होती. 58 टक्के विद्यार्थी दोन अंकी संख्या बेरीज आणि वजाबाकी करू शकत होते.
53 टक्के विद्यार्थी गणिते सोडवतात
इयत्ता सहावीतील फक्त 53 टक्के विद्यार्थीच बेरीज आणि वजाबाकी या बेसिक गणिती प्रक्रिया समजू शकत होते. दहापर्यंत बेरीज आणि गुणाकाराचे पाढे समजू शकतात. तसेच गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी करू शकतात.
सहावीतील विद्यार्थी गणितात ढ
इयत्ता सहावीत भाषा आणि गणितासह एक अतिरिक्त विषय ‘The World Around Us’ सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गणितात सर्वात कमी (46 टक्के) गुण मिळवले. तर भाषा विषयात सरासरी 57 टक्के गुण मिळवले.
नववीतील विद्यार्थी हुशार
इयत्ता सहावीत सरकारी अनुदान प्राप्त आणि राज्य सरकारच्या शाळांनी गणितात खराब प्रदर्शन केले. इयत्ता नववीत केंद्र सरकारच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी सर्वच विषयांच चांगली कामगिरी केली. भाषा विषयात विद्यार्थी आघाडीवर राहिले. खासगी शाळांतील विद्यार्थी विज्ञान आणि सामाजिक विज्ञानात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पण गणितात त्यांचे गुण कमीच राहिले.
‘या’ विषयांत शहरी विद्यार्थी ठरले अव्वल
राज्य सरकार आणि सरकारी अनुदान प्राप्त शाळांत सारखीच परिस्थिती दिसून आली. येथे गणितात विद्यार्थी कच्चे दिसून आले. सर्व प्रकारच्या शाळांत भाषा सर्वाधिक गुण मिळवणारा विषय राहिला. ग्रामीण आणि शहरी भागांतही फरक दिसून आला. ग्रामीण भागात इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी गणित आणि भाषा विषयात चांगली कामगिरी केली तर शहरी भागांतील सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांनी सर्वच विषयांत चांगले प्रदर्शन केले.
शिक्षण सचिव संजय कुमार यांनी सांगितले की आता फक्त मूल्यांकनच नाही तर त्या आधारावर पुढील कार्यवाही करण्याची गरज आहे. यासाठी परख राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 च्या परिणामांना योग्य निर्णयात रुपांतरीत करण्यासाठी अनेक योजनांची तयारी करण्यात आली आहे.