गेल्या वर्षीच कंपन्यांनी दर वाढवले होते आणि आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दूरसंचार कंपन्या ग्राहकांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. मोबाईल रिचार्ज प्लॅनचे दर लवकरच १० ते १२ टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मे महिन्यात ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन महाग करण्याचा विचार सुरू केला आहे. या वर्षअखेरपर्यंत नव्या दरांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र दरवाढीमुळे अनेक ग्राहक पोर्टिंगचा पर्याय निवडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
डेटा लिमिटवरही धोरणात्मक बदल :
अहवालानुसार, कंपन्या केवळ रिचार्ज दरच नव्हे तर डेटा प्लॅनच्या मर्यादेतही बदल करणार आहेत. टेलिकॉम कंपन्या “टायर्ड प्राइसिंग” प्रणाली लागू करण्याचा विचार करत असून, यामध्ये एका मर्यादेनंतर अतिरिक्त डेटा वापरासाठी वेगळा खर्च आकारला जाईल.
यामुळे ग्राहकांना वारंवार डेटा रिचार्ज करावे लागणार असून, वापरावर आधारित शुल्क आकारले जाईल. यासोबतच स्वस्त व लहान डेटा पॅक्स बाजारात आणण्याचीही तयारी सुरू आहे, जेणेकरून ग्राहकांना पर्याय मिळतील पण त्यावर अधिक खर्च करावा लागेल.
मे महिन्यात एकूण ७.४ दशलक्ष (७४ लाख) नव्या युजर्सची नोंद झाली असून, ही गेल्या २९ महिन्यांतील सर्वाधिक वाढ आहे. भारतातील एक्टिव्ह युजर्सची संख्या आता १०८ कोटींवर पोहोचली आहे. यातील ५.५ दशलक्ष युजर्स फक्त जिओमध्ये जोडले गेले आहेत.
जिओचा एक्टिव्ह युजर शेअर आता ५३% वर पोहोचला आहे, तर एअरटेलने १.३ दशलक्ष नवीन युजर्स जोडून आपला वाटा ३६% पर्यंत वाढवला आहे. युजर बेसमध्ये झालेल्या वाढीमुळे या कंपन्यांना दरवाढीसाठी एक योग्य संधी निर्माण झाली आहे.