सानिया मिर्झा नंतर आता भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने देखील पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सायना नेहवाल आणि तिचा पती बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप घटस्फोट घेत आहेत. सायनाने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती शेअर केली. ७ वर्षांच्या सुखी संसारानंतर सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सायना आणि कश्यप यांचे ७ वर्षांपासून लग्न झाले होते. दोघांनीही २०१८ मध्ये लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. कारण बराच काळ या दोन्ही स्टार्सनी त्यांचे नाते मीडिया आणि चाहत्यांच्या नजरेपासून लपवून ठेवले होते. दोघांच्या नात्याची सुरुवात त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात झाली होती. दोघांची भेट हैदराबादमधील दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांच्या अकॅडमिमध्ये झाली होती. जिथे हे दोघे प्रशिक्षण घेत होते. इथूनच दोघांच्या प्रेमकहाणीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाल्याचे सांगितले जात होते.
सायना नेहवालची इन्स्टाग्रामवर पोस्ट
सायना नेहवालने १३ जुलै रोजी रात्री उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट करून घटस्फोट घेत असल्याचे सांगितले. सायनाने या पोस्टमध्ये लिहिले की, 'आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या वळणावर घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर पारूपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, प्रगती आणि शांततापूर्ण जीवन जगणं निवडत आहोत.'
सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप यांच्या विभक्त होण्याचे खरे कारण अद्याप समोर आले नाही. पण सायनाने कश्यपसोबत घालवलेल्या क्षणांबद्दल आनंद व्यक्त केला. सायनाने पुढे असे लिहिले की, 'या आठवणींसाठी मी नेहमीच पारूपल्लीची कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देते. अशावेळी आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.'
या दोघांच्या विभक्त होण्याने मात्र चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.