सध्या नाशिकमध्ये पक्षांतरांचे जोरदार वारे वाहत आहे. आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षासोबत हातमिळवणी करीत आहेत. शिवसेना शिंदे गटातील माजी खासदार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. काही माजी नगरसेवकासह ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतच भूकंप होणार असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहे.
शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मागील दोन - तीन दिवसांपासून राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात ही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. हेमंत गोडसे यांच्यासोबत ५ ते ६ नगरसेवक देखील भाजपासोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो.
या चर्चांवर शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा २ ते ३ दिवसांपासून सुरू असल्या तरी पण मी पक्षातच आहे', असं गोडसे म्हणाले.