नाशिकमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. नाशिकरांकरांच्या घरात होणाऱ्या चोरीत आता आमदाराच्या चोरीचीही भर पडली आहे. नाशिकमध्ये वाढणारी गुन्हेगारी डोकेदुखीचा विषय ठरत असताना चोरीच्या घटनांनीही नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. त्यात आमदाराच्याही घरात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या नाशिकमधील जेलरोड येथील निवासस्थानी चोरी झाली आहे. या प्रकरणी डॉ. प्रवीण रामदास वाघ यांच्या सांगण्यावरून घरी काम करणाऱ्या मोलकरणीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोलकरीण संगीता श्याम केदारे हिने कपाटातून एक लाख रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. आमदार सरोज अहिरे या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत होत्या. या काळातच मोलकरणीने पैशांवर डल्ला मारलाय. यासोबतच ऑक्टोबर 2024 ते 15 जुलै 2025 या कालावधीत घरातून वेळोवेळी रोख रक्कम चोरून नेल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रवीण वाघ यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलिसांनी संगीता केदारे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.