सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या तत्परतेमुळे सोनसाखळी चोर पकडला; वृद्धेचे दागिने परत
सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या तत्परतेमुळे सोनसाखळी चोर पकडला; वृद्धेचे दागिने परत
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): बिटको चौकातील रहदारीच्या मार्गावरून पायी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढणाऱ्या चोरट्यास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी नागरिकांच्या मदतीने पाठलाग करत पकडले. या घटनेत महिलेचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, मोठा अनर्थ टळला आहे.

या बाबत माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शांताबाई माधव आहेर (वय 66) या वृद्ध महिला आपल्या मुलाच्या भेटीसाठी चांदवड येथून बोधले नगर येथे जात होत्या. बोधले नगर येथून बिटको चौकात त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येत असल्याने त्या जलधारा इमारतीजवळ सावलीत थांबल्या असता, एक अज्ञात इसम त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांच्या दोन सोनसाखळ्या खेचून पळाला.

वृद्ध महिलेने आरडाओरड केल्यावर परिसरातील दुकानदार व नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेतली. काहीनी शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. घटनेची माहिती वायरलेसवर मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी खान पेट्रोल पंपाजवळ एक संशयित व्यक्ती ओम हॉस्पिटलच्या दिशेने धावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

डॉ. बारी यांनी नागरिकांच्या मदतीने त्याचा पाठलाग करत त्याला सोन्याच्या साखळीसह ताब्यात घेतले. त्याचवेळी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

तपासात आरोपीचे नाव संतोष गोविंद नरवडे (वय 29) रा. एकलहरा रोड, नाशिक रोड असे असून, शांताबाई आहेर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. बारी यांच्या वेळेवरच्या हस्तक्षेपामुळे आरोपीला तत्काळ पकडता आले, तसेच वृद्ध महिलेचे दागिने सुरक्षित परत मिळाल्याने नागरिकांमधून पोलीस दलाचे कौतुक होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group