सातपूर औद्योगिक वसाहतीत आज सकाळी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा सर्कल जवळ एक थरारक घटना घडली. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास, कंपनीतून वेगाने निघालेली थार गाडी गोडाऊनकडे जात असताना अचानक चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने रस्त्यावरील डिव्हायडर तोडत तब्बल तीन ते चार पलट्या घेतल्या.
गाडीचे पुढचे भाग, काचा, इंधनाचे शिंतोडे आणि विविध सुटे भाग रस्त्यावर विखुरलेले दिसत होते. मात्र हे सगळं पाहूनही आश्चर्याची बाब म्हणजे, चालकाला साधं खरचटलेही नव्हते हे विशेष..
दररोज सकाळी ७ च्या सुमारास या मुख्य रस्त्यावर कामगारांची प्रचंड गर्दी असते. ही घटना जर काही मिनिटांनी उशीराने घडली असती, तर मोठा अनर्थ घडला असता त्याची कल्पना न केलेली बरी अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलिस ठाण्याचे विश्वास पाटील हे पोलिस पथकासह तसेच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी पवन दोंदे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी पार पाडत गर्दी नियंत्रित केली. जेसिबीच्या मदतीने अपघात ग्रस्त थार गाडी रस्त्याच्या कडेला करण्यात आली.
दरम्यान, बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. डिव्हायडर तोडुन थारच्या तब्बल तीन ते चार पलट्या घेतल्या नंतरही, चमत्कारीक किंवा थारच्या मजबुत बांधणीमुळे बचावलेल्या चालकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला.
या घटनेने पुन्हा एकदा वेगावर नियंत्रण राखण्याची आणि रस्ते सुरक्षा पाळण्याची गरज अधोरेखित केली आहे.