हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उपासनेचा काळ. श्रावणामध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते.
विशेषतः श्रावणी सोमवारचे व्रत करणे महत्त्वपूर्ण आणि फलदायी मानले जाते. काही लोक संपूर्ण श्रावण महिन्याचे उपवास करतात. श्रावणी सोमवारी जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
शिवलिंगावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचेही खूप महत्त्व आहे. श्रावण महिना हा आत्मशुद्धीचा, संयमाचा आणि साधनेचा महिना म्हणून ओळखला जातो.
यंदा श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरू होतोय आणि कधी समाप्त होणार आहे, एकूण किती श्रावणी सोमवार असणार आहेत, कोणकोणत्या शिवामूठ वाहव्या? अशी सर्व माहिती या लेखाद्वारे जाणून घेऊया...
यंदा 25 जुलैपासून सुरू होत असून 23 ऑगस्ट रोजी श्रावण महिना समाप्त होत आहे. श्रावणातील सोमवारचे व्रत करण्याचे मोठे महत्त्व आहे. यंदा चार श्रावणी सोमवार आहेत.
श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार आणि कोणत्या धान्याची शिवामूठ वाहावी याची माहिती
- पहिला श्रावणी सोमवार : 28 जुलै
शिवामूठ : तांदूळ
- दुसरा श्रावणी सोमवार : 4 ऑगस्ट
शिवामूठ : तीळ
- तिसरा श्रावणी सोमवार : 11 ऑगस्ट
शिवामूठ : मूग
- चौथा श्रावणी सोमवार : 18 ऑगस्ट
शिवामूठ : जव
शिवामूठ म्हणजे काय?
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मूठ धान्य अर्पण करणे या धार्मिक प्रक्रियेस शिवामूठ असे म्हणतात. कॅलेंडर/पंचांगानुसार प्रत्येक सोमवारी वेगवेगळे आणि एक मूठ धान्य भगवान शंकराच्या पिंडीवर अपर्ण केले जाते. त्यानंतर मनोभावे पूजन आणि नैवेद्य देखील अर्पण केला जातो.