२००८ साली मालेगाव येथे झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल १७ वर्षांनंतर मोठा निर्णय देण्यात आला आहे. एनआयएच्या (राष्ट्रीय तपास यंत्रणा) विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सातही आरोपींना पुराव्यांच्या अभावामुळे निर्दोष मुक्त केले आहे.
विशेष म्हणजे, या निर्णयात मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या भिक्कू चौकात रात्रीच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेत अनेक लोक ठार आणि जखमी झाले होते. याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी आणि सतीश चतुर्वेदी या सात जणांवर गंभीर आरोप लावण्यात आले होते.
NIAने या सर्वांवर मृत्यूदंडाची मागणी केली होती. मात्र, विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयाने तब्बल १००० पानी निकालपत्रात स्पष्टपणे नमूद केले की, आरोप सिद्ध करणारे ठोस पुरावे उपलब्ध नव्हते.
निर्णयानंतर आरोपी समीर कुलकर्णी यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “१७ वर्षं आम्ही पिडीत होतो, आज आमचा पुनर्जन्म झाला.” त्यांच्यावर बॉम्ब तयार करण्यासाठी लागणाऱ्या स्फोटकांची व्यवस्था केल्याचा आरोप होता. मात्र, तो न्यायालयात सिद्ध झाला नाही.
या निर्णयामुळे १७ वर्षे सुरु असलेल्या खटल्याचा शेवट झाला असून, निर्दोष ठरलेल्या सर्व आरोपींना आता न्याय मिळाल्याचे मानले जात आहे. मात्र, यामधून मृतांचे कुटुंबीय आणि जखमींना न्याय मिळावा म्हणून कोर्टाने नुकसानभरपाईचा आदेश दिला आहे.