अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी काही थांबताना दिसत नाही आहे. दोघांविरोधात पुन्हा एकदा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. शिल्पा-राज यांच्याविरोधात ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध लूकआउट नोटिस बजावली आहे. ज्यामुळे ते दोघे देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत.
शिल्पा आणि राज यांच्यावर उद्योगपती दीपक कोठारी यांची सुमारे ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. उद्योगपती दीपक कोठारी यांनी आरोप केला आहे की २०१५ ते २०२३ दरम्यान शिल्पा आणि राज यांनी व्यवसाय विस्ताराच्या नावाखाली त्यांच्याकडून ६० कोटी रुपये घेतले होते परंतु त्यांनी हे पैसे वैयक्तिक वापरासाठी वापरले. आरोपानुसार, ही रक्कम कर्ज म्हणून घेतली गेली होती, परंतु नंतर ती कर वाचवण्यासाठी गुंतवणूक म्हणून दाखवण्यात आली.
तक्रारदाराने आरोप केला आहे की, यापूर्वी त्यांना आश्वासन देण्यात आले होते की ही रक्कम १२ टक्के वार्षिक व्याजदराने योग्य वेळी परत केली जाईल. एप्रिल २०१६ मध्ये शिल्पा शेट्टीने लेखी स्वरूपात वैयक्तिक हमी देखील दिली होती, परंतु काही महिन्यांतच तिने कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला.
नंतर कोठारी यांना कळले की कंपनीविरुद्ध १.२८ कोटी रुपयांचा दिवाळखोरीचा खटला आधीच सुरू आहे, ज्याची त्यांना माहिती देण्यात आली नव्हती. पण, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी हे आरोप निराधार आणि कपलची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.