लडाखची राजधानी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारा प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. सोनम वांगचुक सरकारच्या रडारवर आहेत. कालच सोनम वांगचुक यांच्या स्टूडेंट्स एजुकेशनल अँड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख (एसईसीएमओएल) एफसीआरए लायसन्स रद्द करण्यात आलं होतं. वांगचुक यांना लेह हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
काल गुरुवारी केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये गुरुवारी तणावपूर्ण शांतता होती. या दरम्यान पोलीस आणि अर्धसैनिक बलांनी लेह शहरात कठोरतेने कर्फ्यू लागू केला. दोन दिवसांपूर्वी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी विरोध प्रदर्शन झालं होतं. त्यावेळी अचानक हिंसाचार झालेला. यात चौघांचा मृत्यू झाला. 90 जण जखमी झाले होते.सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
लेहमध्ये बंद दरम्यान लडाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन करणारे आंदोलक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष झाला. या व्यापक संघर्षामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. ४० पोलीस कर्मचाऱ्यांसह ८० जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दोन दिवसांनी म्हणजेच आज (२६ सप्टेंबर) रोजी अटक झाली आहे. ते दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेणार होते. पण त्याआधीच त्यांना अटक झाली.
लडाखला राज्याचा दर्जा आणि संवैधानिक संरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी वैयक्तिक सुरक्षेची चिंता देखील व्यक्त केली होती. 'मला वाटते की ते (प्रशासन) माझ्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत खटला चालवण्याचा आणि मला दोन वर्षे तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत', असे सोनम वांगचुक म्हणाले होते. 'माझ्यावर कारवाई होणार आहे, यासाठी मी तयार आहे', असेही त्यांनी म्हटले होते. सोनम वांगचुक यांना तुरुंगात ठेवल्याने जास्त समस्या निर्माण होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.