कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना मोबाइलवर अश्लील संदेश आणि फोटो पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत शिवाजी पाटील म्हणाले, 'ती व्यक्ती व्हॉट्सअॅपवर मेसेज आणि व्हिडिओ कॉल करीत होती. मी नंबर ब्लॉक केला होता. मेसेजवर अश्लील फोटो पाठवत होती. असं दोनवेळा घडलं. नंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या महिलेने सुरुवातीला एक लाख, नंतर दोन लाख आणि अखेर पाच लाख अशा हप्त्यांमध्ये एकूण 10 लाख रुपयांची मागणी केली.
काही काळानंतर पाटील यांनी महिलेचा त्रास वाढल्यामुळे त्या महिलेला ब्लॉक केले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील फोटो आणि संदेश पाठवले. पैसे न दिल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून राजकीय प्रतिमा मलिन करीन, अशी धमकीही तिने दिली.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या आमदार पाटील यांनी 8 ऑक्टोबर रोजी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर प्रकरणात आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, प्राथमिक तपासात हा सायबर हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणी चंदगड पोलिसांनी कारवाई करत २५ वर्षीय पवन पवार या तरूणाला ताब्यात घेतलंय. आरोपी चंदगड येथील रहिवासी आहे. आरोपी तरूणाला ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलीस चंदगडमध्ये जाण्याची शक्यता आहे. शिवाजी पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडुन आले आहे.