महाभारतातील कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. पंकज धीर यांना कॅन्सर झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते पण ती अपयशी ठरली. मुंबईमध्ये त्यांचे निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

पंकज धीर यांनी बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'मध्ये कर्ण हे पात्र साकारले होते. या मालिकेच्या माध्यमातून ते घराघरामध्ये पोहचले होते. त्यांनी बॉलिवूडचे अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. पंकज धीर यांना काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला. त्यातून ते बरे देखील झाले होते. पण काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सर झाला.
त्यानंतर त्यांची प्रकृती खूपच खालावली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती आणि रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खूपच बिघडत गेली आणि ते हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार आणि त्यांचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.