आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान सिकंदर शेख याला अटक करण्यात अली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी सिकंदर शेख याला अटक केली आहे. सिकंदरचा सहभाग आंतरराज्यीय शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीत असल्याचा प्राथमिक तपासातून समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदरचे संबंध असल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी असलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यासह चौघांना सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात मोहाली (पंजाब) येथे अटक केली आहे.
सिकंदरला एकीकडे कुस्तीत यश मिळालेले असतानाच, दुसरीकडे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक झाल्याने कुस्ती क्षेत्राला जबरदस्त हादरा बसला आहे. सिकंदर हा सध्या पंजाब राज्यातील मुल्लापूर गरीबदास येथे सराव करत आहे.
हरियाणा आणि राजस्थानातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे २४ ऑक्टोबर रोजी एसयूव्ही गाडीतून दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते. संबंधित शस्त्रे कृष्ण ऊर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती.
पंजाब पोलिसांनी चारही संशयीत आरोपींकडून १.९९ लाख रुपयांची रोकड, पाच पिस्तुले, काडतुसे, दोन एसयूव्ही गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी खरड (पंजाब) पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून, पुढील चौकशीत या प्रकरणातील आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याला अटक झाल्याने त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला.