२१ कोटींची म्हैस, प्रदर्शनात कोसळली अन् जीव सोडला; Video पाहून लोकांना वेगळीच शंका
२१ कोटींची म्हैस, प्रदर्शनात कोसळली अन् जीव सोडला; Video पाहून लोकांना वेगळीच शंका
img
वैष्णवी सांगळे
देशभरात चर्चेत असलेला पशु मेळावा आणि या मेळाव्यातील चर्चेत असलेली २१ कोटींची म्हैस हीच्याबाबत एक दुःखद घटना घडली आहे. राजस्थानमधील लोकप्रिय पुष्कर पशु मेळ्यातून ही हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.  या मेळाव्यामध्ये शुक्रवारी सुमारे २१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या एका म्हशीची तब्येत अचानक बिघडली. 



ही म्हैस मेळाव्यामध्ये मालकाने उभारलेल्या तंबूतच कोसळली. तिच्या तोंडातून फेस आला आणि पुढल्या क्षणी तिने प्राण सोडले. अचानक प्रकृती बिघडल्याने तिचा मृत्यू झाल्याचं आता सांगण्यात येत आहे. मात्र ही म्हैस मेळ्यातील मुख्य आकर्षणांपैकी होती आणि तिचाच अशाप्रकारे मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राजस्थानमधील पुष्कर पशु मेळा सर्वत्र प्रसिद्ध आहे.  नेहमी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आयोजित होणारा हा सप्ताहभर चालणारा मेळा दरवर्षी भारत आणि जगभरातील हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. यंदाही या मेळ्यात अनेक मौल्यवान पशुधन दाखल झाले आहे. याच मेळ्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय असलेल्या २१ कोटी रुपयांच्या म्हशीच्या मृत्यूची बातमी अचानक सोशल मीडियावर पसरली. 

तब्बल '२१ कोटी रुपये' इतकी विक्रमी किंमत असलेली म्हैस दगावल्याची बातमी समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरल्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर इंस्टाग्रामवर अनेकांनी या म्हशीच्या मृत्यूबद्दल आश्चर्य व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. एकाने, "हा अनैसर्गिक मृत्यू असू शकतो," असं म्हटलं आहे. अनेकांनी या म्हशीवर विषप्रयोग झालेला असून शकतो अशीही शंका उपस्थित केली आहे. 'स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे' या अकाऊंटवरुन व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

"खरंतर अनेक कारणे आहेत, ज्यात ताणतणाव, आधीच अस्तित्वात असलेल्या आरोग्य समस्या आणि व्यवसायाच्या फायद्यासाठी मालकांनी दुर्लक्ष केलेले अनेक घटकांचा या मृत्यूचा विचार करताना आढावा घ्यावा लागेल. अशा मेळाव्यांमध्ये सहभागी होणाऱ्या म्हशी मोठ्या आणि जाड दिसण्यासाठी त्यांनी अनेक औषधे आणि इंजेक्शन दिली जातात," असं व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.  "यावर बंदी घातली पाहिजे, मानवतेला लाज वाटते," दुसऱ्या एकाने म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group