नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी): रायपूर (छत्तीसगड) येथील जोहोर समाजाच्या स्वयंघोषित नेत्याने सोशल मीडियावर सिंधी समाज व त्यांच्या पूजनीय देवता श्री झुलेलाल साई यांचा अपमानास्पद उल्लेख केल्याच्या निषेधार्थ आज नाशिक शहर व नाशिक रोड परिसरातील सिंधी समाज बांधवांनी स्वयंस्फूर्तीने सर्व दुकाने बंद ठेवत तीव्र संताप व्यक्त केला.
या घटनेमुळे नाशिक रोड परिसरात "नाशिक रोड बंद" असल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. मुक्तीधाम मंदिर परिसर, मीना बाजार, सुभाष रोड, जुने बिटको हॉस्पिटल परिसर, शाहूपथ, टिळकपथ, मस्जिद रोड, दत्त मंदिर रोड, जेल रोड, शिवाजीनगर आदी भागातील सिंधी बांधवांची दुकाने दिवसभर बंद राहिली. त्यामुळे परिसरात शुकशुकाट पसरला आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला.
सदर प्रकरणातील आरोपी अमित बघेल या रायपूर येथील जोहोर समाजाच्या नेत्याने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे सिंधी समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या आहेत. देशभरात या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात येत असून अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली आहेत.
नाशिक शहरातील सिंधी पंचायतने या निषेधार्थ एकदिवसीय बंदचे आयोजन केले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून “अमित बघेलवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी” अशी मागणी केली आहे.
या मोर्चात पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने सिंधी बांधव सहभागी झाले होते. संपूर्ण मोर्चात “जय झुलेलाल”, सिंधी सनातन हिंदू है या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. समाजाच्या श्रद्धास्थानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा सिंधी समाज नेत्यांनी यावेळी दिला.