नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- फ्लॅटचे कुलूप तोडून बळजबरीने कब्जा करून उलट घरमालकाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागणार्या धुळ्याच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अनिल वाल्मीक गोसावी (रा. अंतुर्ली, ता. भडगाव, जि. जळगाव) यांच्या मालकीचा आडगाव शिवारात जगन्नाथ अपार्टमेंटमध्ये दुसर्या मजल्यावर फ्लॅट आहे. फिर्यादी गोसावी यांची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता आरोपी बंटी ऊर्फ विशाल कोळी (रा. धुळे) याने गुन्हेगारी प्रवृत्तीने दुसर्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 10 चे कुलूप तोडून गुन्हेगारी पद्धतीने बेकादेशीरपणे कब्जा करून फ्लॅटमध्ये भाडेकरू टाकले.
त्याबाबत बंटी याला फिर्यादीने विचारणा केली असता “हा फ्लॅट तुझ्या नावावर असला, तरी तो आता माझा आहे.येथून पुढे मी ठरवीन फ्लॅटचे काय करायचे ते. तुझा आणि फ्लॅटचा आता काही एक संबंध नाही. तू जर पोलिसांत गेलास किंवा इतर काही केले, तर तुझ्यावर अॅट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करीन. तुला जर फ्लॅट परत पाहिजे असेल, तर मला पाच लाख रुपये दे, अशी मागणी केली व जिवे ठार मारण्याची भीती घातली, तसेच आरोपी बंटी कोळी याने फ्लॅटमध्ये परस्पर टाकलेल्या भाडेकरूकडून भाडे घेऊनही त्यातील एक रुपयाही फिर्यादी गोसावी यांना दिला नाही.
हा प्रकार सन 2022 ते दि. 11 नोव्हेंबर 2025 या कालावधीत घडला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आरोपी बंटी कोळीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम करीत आहेत.