कुठे EVM चं सील तोडल्याचा आरोप तर कुठे रातोरात मतदान वाढल्याचा दावा; 'या' स्टाँगरूमबाहेर उडाला गोंधळ
कुठे EVM चं सील तोडल्याचा आरोप तर कुठे रातोरात मतदान वाढल्याचा दावा; 'या' स्टाँगरूमबाहेर उडाला गोंधळ
img
वैष्णवी सांगळे
८ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी अखेर २ डिसेंबरला मतदान पार पडले. हा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबरला लागणार होता  मात्र हायकोर्टाच्या आदेशामुळे ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. 

ज्याठिकाणी मतदान झाले त्याठिकाणी स्टाँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आले आहे. मात्र यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गोंदियाच्या सालेकसा येथे ईव्हीएमचं सील तोडल्याच्या आरोपावरून राडा झाला आहे तर सांगलीत मतदानात अचानक कशी वाढ झाली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान २ डिसेंबरला झाले. त्यानंतर आता याठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाडी आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना यांच्यासह शरद पवारांच्या पक्षातील उमेदवारांनी तहसिल कार्यालयाला घेराव घातला. जवळपास १२ तास कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. 

तर दुसरीकडे सांगलीतील आष्टा नगरपरिषदेत मतदानाचा टक्का वाढल्याचा आरोप करत शरद पवार गटासह शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला. वेबपोर्टलवरून मतदानाच्या टक्केवारीबाबत आकडेवारी मिळाली. एकूण मतदार संख्या ३३ हजार ३२८ दाखवली, एका प्रभागात १३११ मतदान असताना तिथे ४ हजार मतदान दाखवले आहे. ६ नंबर प्रभागात एकूण मतदान ३ हजार ५६ आहे. यात मतदान २३९४ झाले आहे तिथे १७९५ मतदान दाखवले आहे. यासारख्या अनेक त्रुटी दिसून येत आहेत. त्यामुळे याठिकाणी स्टाँगरूमबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. 

दरम्यान, स्टाँगरूमबाहेर राज्य निवडणूक आयोग, पोलीस काळजी घेत असते. काही लोक पराभूत मानसिकतेत असतात. त्यांना निकालाची धाकधूक असते. त्यातून नैराश्य येते आणि हे आरोप केले जातात. निवडणुकीत निकालापूर्वीच ज्यांना पराभव दिसत असतो ते या भूमिका घेत असतात असं सांगत भाजपा नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group