कॉग्रेसच्या राजकीय पटावरील अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी ओळख असणारे नेते ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लातूरमधील “देवघर” या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने शिवराज पाटील चाकूरकर यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आहे. देशातील संवैधानिक प्रक्रियेत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले.
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. १९९१ ते १९९६ या काळात ते देशाचे १० वे लोकसभा अध्यक्ष होते. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवे ग्रंथालय इमारत यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली.
अनेक वर्ष त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे काम केले. पक्षानी दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी पार पाडली. अर्ध आयुष्य त्यांनी कॉंग्रेस पक्षाला दिले. 35 ते 40 वर्ष त्यांनी खासदार म्हणून काम केले. लातूर जिल्ह्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे राजकीय वलय होते. आपल्या जिल्ह्याचा विकास जास्तीत जास्त कसा होईल, याकरिता ते आग्रही असायचे. त्याप्रमाणे ते काम करत. मोठी ताकद लातूर जिल्ह्यात कॉंग्रेसची शिवराज पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून होती.