नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, गुन्हेगारी घटनांमध्येही लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आरपीआयचे नवी मुंबई जिल्हा सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर भरदिवसा कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या हल्ल्यात दिलपाक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून या हल्ल्यात कोणाचा सहभाग होता आणि त्यांचा आका कोण आहे? याचा तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.राजकीय वैमनस्यातून ही घटना घडली का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहे.