जेवणाला मिठाशिवाय चव येत नाही हे अगदी खरं आहे पण मीठ टाकायचं राहील असेल किंवा कमी असेल तर अनेक लोक मग जेवणावरून मीठ टाकतात. अनेकदा तर जेवणात मीठ योग्य असताना देखील अनेक जण वरून मीठ टाकतात कारण तशी त्यांना सवय लागलेली असते. काकडी-टोमॅटोच्या सलाडवर, ताकामध्ये किंवा फळांवर वरून मीठ भुरभुरवून खाणे चवीला जरी चांगले वाटत असले, तरी ते आरोग्यासाठी सायलेंट किलर ठरत आहे. आणि हीच सवय अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. हे तुम्हांला माहिती आहे का ? नाही, तर चला मग जाणून घ्या
एका जागतिक अहवालानुसार, दरवर्षी जगभरात सुमारे १८ लाख लोक केवळ मिठाच्या अतिसेवनामुळे उद्भवणाऱ्या आजारांनी आपला जीव गमावतात. शरीरासाठी मीठ आवश्यक असले तरी, त्याचे प्रमाण ५ ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. मीठामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. जेव्हा शरीरात सोडियम वाढते, तेव्हा ते पाणी साठवून ठेवते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो. याचे काही प्रमुख दुष्परिणाम आहेत.
मिठाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
उच्च रक्तदाब - जास्त सोडियममुळे रक्ताभिसरण प्रक्रियेत पाणी साचते. यामुळे रक्तदाब वाढतो. हाय ब्लड प्रेशरमुळे केवळ हृदयावरच नाही, तर संपूर्ण रक्तवाहिन्यांवर ताण येतो. सातत्याने मीठ जास्त खाल्ल्याने रक्तवाहिन्या कडक होतात, ज्याला वैद्यकीय भाषेत हायपरटेन्शन म्हणतात.
पोटाच्या कॅन्सरचा धोका - मिठाचे अतिसेवन पोटाच्या आतील नाजूक आवरणावर परिणाम करते. संशोधनानुसार, जास्त मीठ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये पोटाचा अल्सर आणि गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.
किडनीचे नुकसान - रक्तातील अतिरिक्त सोडियम आणि पाणी फिल्टर करण्याचे काम किडनी करते. मात्र, मिठाचे सेवन वाढल्यास किडनीवर कामाचा ताण वाढतो. यामुळे भविष्यात किडनी स्टोन किंवा किडनी निकामी होण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
हार्ट अटॅकचा धोका - जेव्हा रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो, तेव्हा हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
वजन वाढणे आणि सूज - शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्याने 'वॉटर रिटेंशन' होते. यामुळे अचानक वजन वाढल्यासारखे वाटते. तसेच हात, पाय आणि चेहऱ्यावर सूज येते.