इंडियन प्रीमिअर लीगचे (IPL) संस्थापक आणि पहिले अध्यक्ष ललित मोदी भारतातून फरार झाले. दुसरे फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदी यांनी भव्य अशी पार्टी ठेवली होती. या पार्टीतील एक व्हिडीओ त्यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “आम्ही दोघे भारतातील सर्वात मोठी फरार लोक आहोत”, असे ते दुसऱ्या एका व्यक्तीला सांगताना दिसतात.
ललित मोदी यांनी हे गमतीने म्हटले असले तरी त्यांनी व्हिडीओला जे कॅप्शन दिले आहे, त्यावरून ते भारताची टिंगल उडवत आहेत, असा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.ललित मोदी यांनी स्वतःची आणि विजय मल्ल्या यांची ओळख उपहासात्मक पद्धतीने एका विदेशी व्यक्तीला करून दिल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे. मात्र हे सांगत असतान त्यांचे हावभाव आणि त्यानंतर दोघांचेही कुत्सित हास्य सोशल मीडियावर टीकेच्या केंद्रस्थानी आहे.
ललित मोदी यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टला एक कॅप्शन दिली आहे. Let’s break the internet down in India again. Happy birthday my friend #vijaymallya Love u, असे यामध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये स्पष्टपणे भारत सरकार आणि तपास संस्थांवर टीका केली आहे. व्हिडिओमध्ये, दोन्ही व्यावसायिक पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.
हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर लोकांचा संताप उफाळून आला. वापरकर्त्यांनी याला भारतीय कायदा आणि सुव्यवस्थेची थट्टा म्हटले. अनेक कमेंट्समध्ये असे म्हटले आहे की, "हे लोक भारत सरकारची किती मोठी थट्टा करत आहेत."