देशाचे दिग्गज उद्योजकांच्या यादीतील अव्वल वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 2026 वर्षाच्या सुरुवातील त्यांनी एकुलत्या एका मुलाला गमावलं आहे. अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांनी वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्यामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या निधनानंतर आता संपत्तीचं काय होणार अशा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे.
मुलाच्या मृत्यूनंतर अनिल अग्रवाल यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली. “आज माझ्या आयुष्यातील खूप दु:खद दिवस आहे. माझा अग्निवेश 49 वर्षांचा मुलगा, आज आपल्यामध्ये नाहीय. एका बापाच्या खांद्यावर मुलाची अत्यंयात्रा’, यापेक्षा वाईट काय असू शकतं?” असं अग्रवाल यांनी लिहिलं आहे.
माहितीनुसार, अग्निवेश अग्रवाल आपल्या मित्रासोबत अमेरिकेत 'स्कीइंग' करत होते. खेळताना त्यांना गंभीर दुखापत झाली आणि तातडीने न्यूयॉर्कच्या माउंट सिनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि ते सावरतील अशी आशा होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.
३ जून १९७६ रोजी बिहारच्या पाटणा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात अग्निवेश यांचा जन्म झाला होता. अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले अग्निवेश केवळ एक उद्योजक नव्हते, तर ते उत्तम बॉक्सिंग चॅम्पियन आणि संगीतप्रेमीही होते वेदांता समूहाच्या उपकंपन्यांमध्ये ते अत्यंत सक्रिय होते, विशेषतः 'तलवंडी साबो पॉवर लिमिटेड'च्या बोर्डावर त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांची बहीण प्रिया अग्रवाल-हेब्बर या सध्या हिंदुस्थान झिंकच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत.
अनिल अग्रवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये मुलासोबत पाहिलेल्या स्वप्नांचा उल्लेख केला आहे. "आम्ही दोघांनी मिळून 'स्वावलंबी भारताचे' स्वप्न पाहिले होते. मी अग्निवेशला एक वचन दिले होते की, आपल्याकडे जेवढं धन येईल त्यातील ७५ टक्क्यांहून अधिक भाग समाजकार्यासाठी खर्च करू.आज माझा मुलगा आपल्यात नसला, तरी त्याचे स्वप्न आणि हे वचन मी मोडणार नाही. इथून पुढचे माझे आयुष्य अधिक साधेपणाने असेल आणि तो पैसा समाजहितासाठीच वापरला जाईल," असा ऐतिहासिक निर्णय अग्रवाल यांनी पुन्हा बोलून दाखवला आहे.
अनिल अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अग्निवेश हा केवळ त्यांचा मुलगा नव्हता, तर त्यांचा जिवलग मित्र आणि जग होता. एकीकडे संपत्तीचे शिखर आणि दुसरीकडे मुलाचा विरह अशा कात्रीत आज अग्रवाल कुटुंब सापडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी किरण अग्रवाल, मुलगी प्रिया आणि आई-वडील असा परिवार आहे.