अलीकडेच राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणूका झाल्या. १६ जानेवारी निकाल लागला. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एआयएमआयएम (AIMIM) पक्षाच्या सहर शेख नगरसेविका म्हणून निवडून आल्या. निवडणुकीतील या विजयानंतर केलेल्या भाषणात सहर शेख यांनी,“कैसा हराया, अभी हम लोगों को मुंब्रा को पूरा हरा कर देना है,”असे वक्तव्य करत थेट जितेंद्र आव्हाड यांना डिवचले होते.
या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आता मराठी अभिनेता अभिजीत केळकरने सहर शेख यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने सहर शेख यांच्या वक्तव्यावर आपल्या अनोख्या आणि खोचक शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून, तो नियमितपणे फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतो. यासोबतच तो अनेकदा समसामयिक आणि राजकीय विषयांवरही आपली स्पष्ट मतं मांडतो.
या व्हिडीओमध्ये अभिनेता झाडे लावताना दिसतो आहे. सहर शेख यांच्या विधानाची खिल्ली उडवत तो म्हणतो,“हरा कर दिया ना… अरे, मी तर म्हणतो फक्त मुंब्राच नव्हे, तर अख्खा हिंदुस्थान हिरवा करून टाका. काय ताई… नाय कळलं? अहो, आमच्यात पण हिरवं करतात; पण ते झाडे लावून. झाडे लावा, झाडे जगवा! वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…”
अभिजीतने यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले, "फक्त मुंब्रा नको, अख्खा हिंदुस्थान, पृथ्वी 'हिरवी'गार करुन टाका...झाले लावा झाडे जगवा."अभिजीतच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला पाठिंबा दिला आहे. 'छान उत्तर दिलंस..जय महाराष्ट्र, जय शिवराय', 'भारी अभिजीत दादा...', 'ही हिरवळ आवडेल', ' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.