काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना शिवीगाळ केली ? किरण रिजिजूंच्या आरोपाने एकच खळबळ
काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना शिवीगाळ केली ? किरण रिजिजूंच्या आरोपाने एकच खळबळ
img
वैष्णवी सांगळे
काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात घुसून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. “जवळपास २० ते २५ काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात प्रवेश केला आणि त्यांना शिवीगाळ केली. मीही तिथे होतो. बिर्ला यांचा स्वभाव मृदू आहे, अन्यथा त्यांनी कडक कारवाई केली असती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रियांका गांधी आणि केसी वेणुगोपाल यांच्या इतर काँग्रेस खासदार दालनात उपस्थित होते”, असे रिजिजू यांनी पत्रकारांना सांगितले.

रिजीजू यांनी केवळ दालनातील गैरवर्तनाचाच उल्लेख केला नाही, तर संसदेच्या नियमावलीला पायदळी तुडवल्याचा दावाही केला. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी आपण कोणाच्याही परवानगीशिवाय बोलणार असल्याचे जाहीर केले असून, ते नियमांचे उल्लंघन करत आहेत. संसदेत पंतप्रधान असोत वा सामान्य खासदार, प्रत्येकाला सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच बोलावे लागते, हा संकेत राहुल गांधी नाकारत असल्याचे रिजीजू म्हणाले.

दुसरीकडे, विरोधी पक्षांनी मंगळवारीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरुन हटवण्यासाठी नोटीस दिली. विरोधकांच्या आरोपानुसार, अध्यक्ष हे पक्षपातीपणे वागत असून जोपर्यंत या नोटीसवर निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांनी कामकाजाचे अध्यक्षपद भूषवू नये. काँग्रेस खासदारांच्या विरोधात अध्यक्षांनी केलेल्या दाव्यांनाही विरोधकांनी 'खोटे' ठरवले.त्याचवेळी, भाजपने विरोधकांच्या या हालचालीवर कडाडून टीका केली असून, हा संसदीय संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. 

4 फेब्रुवारी रोजी संसदेत जे काही घडले, त्याचे व्हिडिओ फुटेज रिजीजू यांनी प्रसिद्ध केले, ज्यामध्ये विरोधी पक्षाच्या महिला खासदार सत्ताधारी बाकांकडे चालून जाताना दिसत आहेत. जर भाजप खासदारांना रोखले नसते, तर परिस्थिती अधिक स्फोटक झाली असती, असे रिजीजू यांचे म्हणणे आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group