सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची पुन्हा एकदा झळ बसणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाची विक्रमी घसरण झाली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चामुळे आघाडीच्या FMCG (Fast Moving Consumer Goods) कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमतीत २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यामुळे केंद्र सरकारने गेल्या वर्षी जीएसटी कपातीद्वारे दिलेला दिलासा आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
गेल्या ३० जानेवारी रोजी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ९२.०२ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. यामुळे कच्च्या मालाची आयात करणे कंपन्यांसाठी अत्यंत महाग झाले आहे. त्यासोबतच सध्या कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. साबण आणि डिटर्जंट तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सल्फर, पॅराफिन आणि खोबरेल तेल यांसारख्या घटकांचे दर थेट कच्च्या तेलावर अवलंबून असतात. हा आयात खर्च वाढल्याने कंपन्यांनी हा भार ग्राहकांवर टाकला आहे.
सध्या जवळपास सर्वच कंपन्यांनी दैनंदिन वस्तूंच्या किंमतीत वाढ केली आहे. यात डिटर्जंट सेगमेंटमध्ये सर्फ एक्सेल, रिन, निम आणि डोमेक्स यांसारख्या ब्रँड्सच्या किंमती वधारल्या आहेत. तसेच ओट्स, चॉकलेट्स, नूडल्स आणि नाश्त्याच्या धान्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. डाबर इंडियाने आपल्या वाटिका हेअर ऑईल आणि रिअल ज्यूसच्या किंमतीतही २ टक्क्यांची वाढ केली आहे.
कोणकोणत्या वस्तू महाग?
साबण: रोजच्या वापराचे विविध ब्रँड्सचे अंघोळीचे साबण
डिटर्जंट: सर्फ एक्सेल (Surf Excel), रिन (Rin), विम (Vim) आणि डोमेक्स (Domex)
केसांचे तेल: डाबर वाटिका हेअर ऑईल आणि इतर ब्रँड्सची तेले.
चहा: टाटा टी (Tata Tea) च्या दरात वाढ झाली आहे.
नाश्त्याचे पदार्थ: ओट्स (Oats), नाश्त्याची धान्ये (Cereals) आणि नूडल्स.
इतर: चॉकलेट्स, बिस्किटे आणि रिअल ज्यूस (Real Juice).
इतर: शॅम्पू, हेअर डाय आणि टूथपेस्ट.