इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यामध्ये मागील १५ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या झळा जगभरात बसत असतानाच किम जोंग उन यांच्या उत्तर कोरियाकडून मोठी लष्करी हालचाल करण्यात आली आहे. उत्तर कोरियाने शनिवारी संशयास्पद बॅलिस्टिक प्रक्षेपणास्त्र डागले. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाकडून नव्या बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी घेण्यात आली. किम जोंग यांच्या या निर्णयामुळे जपानमध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
उत्तर कोरियाने पूर्व दिशेने समुद्राकडे संशयास्पद आंतरखंडीय (बॅलिस्टिक) क्षेपणास्त्र डागले असल्याची माहिती मिळत आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. पश्चिम आशियात इराण-इस्रायल यांच्यात आधीच युद्धाचा भडका उडालेला असताना आता पूर्व आशियातही तणाव निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत.
उत्तर कोरियाकडून होणाऱ्या लष्करी हालचालीनंतर जपान सरकारने तातडीचा इशारा दिला आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, सध्याच्या ताज्या घडामोडींबद्दल जनतेने सतर्क राहावे. उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले आहे. पुढील माहिती लवकरात लवकर देऊ. या घटनेनंतर जपानच्या पंतप्रधान सनाए ताकायची यांनी क्षेपणास्त्र प्रक्षेपण केलेल्या मार्गावर तात्काळ आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली आहे. फेब्रुवारी २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ताकायची यांनी प्रादेशिक सुरक्षा आणि जपानी भूभागाच्या संरक्षणावर आपण लक्ष देऊ असे म्हटले होते.
त्यासोबतच दक्षिण कोरियाकडूनही उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आल्याच्या वृत्ताबाबत भाष्य करण्यात आले आहे. उत्तर कोरियाने पूर्वे समुद्रकिनाऱ्यावरुन अज्ञात वस्तू प्रक्षेपित ( संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी) केल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. जपान या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाने सोडलेली क्षेपणास्त्रे समुद्रात पडल्याची माहिती जपानकडून देण्यात आली आहे. सध्या दक्षिण कोरियन लष्कराच्या वार्षिक सैन्य कवायती (फ्रीडम शिल्ड) सुरु आहेत.
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात असलेल्या पूर्वापार संघर्षामुळे उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियाच्या या वार्षिक सैन्य कवायतींना विरोध केला जातो. उत्तर कोरियाने शनिवारी अचानक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्रचंड मोठी लष्करी ताकद, आधुनिक युद्धसामुग्री आणि अणवस्त्रधारी असलेला उत्तर कोरिया या सगळ्या संघर्षात उतरल्यास हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील सर्व देश उत्तर कोरियाच्या हालचालींकडे लक्ष ठेऊन आहेत.