रेमंड ग्रुपचे चेअरमन व एमडी गौतम सिंघानिया हे काल (शुक्रवारी) मालदीवमध्ये स्पीड बोट उलटल्याने जखमी झाले. या बोटीत सिंघानियांसह सात जण होते. त्यांना तत्काळ विमानाने मुंबईत आणण्यात आले. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर रॅली ड्रायव्हर हरिसिंगसह दोन भारतीय बेपत्ता आहेत, तर तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात मालदीवच्या फेलिधू भागात गुरुवारी रात्री ११च्या सुमारास झाला. सिंघानिया यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ७ पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट समुद्रातील लाटांमुळे अचानक उलटली. या बोटीवर ५ भारतीय, १ ब्रिटीश आणि १ रशियन नागरिक होते. अपघातानंतर ५ लोक समुद्रात फेकले गेले. या अपघातात त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि भारताचे दिग्गज रॅली ड्रायव्हर हरी सिंह बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. गौतम सिंघानिया यांना या अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
प्रसिद्ध रॅली ड्रायव्हर हरी सिंह बेपत्ता
या अपघातातील सर्वात मोठी चिंता म्हणजे भारतातील दिग्गज रॅली ड्रायव्हर हरी सिंह आणि आणखी एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. मालदीव कोस्ट गार्ड आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यांचा शोध घेण्यासाठी समुद्रात मोठी मोहीम राबवली जात आहे.
देशातील सर्वात यशस्वी रॅली ड्रायव्हर्समध्ये हरी सिंह यांचे नाव आदराने घेतले जाते. 'द फ्लाइंग सिख' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरी सिंह यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. १९९० च्या दशकात त्यांनी सलग ५ वेळा इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप (INRC) जिंकण्याचा विक्रम केला आहे. पहिली 'एशिया झोन रॅली चॅम्पियनशिप' जिंकण्याचा मानही त्यांच्याकडे जातो. त्यांनी जेके टायर मोटरस्पोर्टचे हेड ऑफ ऑपरेशन्स आणि मर्सिडीज-बेंज इंडियाचे चीफ इंस्ट्रक्टर म्हणूनही काम पाहिले आहे.