सात दशके आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. छातीत संसर्ग झाल्याने शनिवारी 11 एप्रिलला त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आलं नाही. 12 एप्रिलला त्यांची प्राणज्योत मालवली. आज शिवाजी पार्क इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
आशा भोसले यांचे पार्थिव आज (सोमवारी) सकाळी ११ ते ३ दरम्यान लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. काल (रविवारी) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तर आज सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेतलं. आशाताईंना शेवटचं पाहताना सचिन तेंडुलकर भावुक झाल्याचं पहायला मिळालं/
आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखले जायचे. त्यांनी केवळ हिंदीतच नव्हे तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह इंग्रजी, रशियन, नेपाळी, मल्याळम, तमिळ अशा अनेक भाषांमध्ये आपली जादू पसरवली आहे. . शास्त्रीय संगीत असो, कव्वाली, पॉप किंवा डिस्को गाणी, आशाताईंनी प्रत्येक प्रकारच्या गाण्याला न्याय दिला.