नाशिक: शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, आज सकाळी सातपूर परिसरातील जाधव संकुल येथे एका अज्ञात चोरट्याने महिला दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत.
२४ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास जाधव संकुल परिसरातील एका दुकानात संबंधित महिला कामकाज पाहत होत्या. सकाळची वेळ असल्याने परिसरात वर्दळ कमी होती. याचाच फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला. काहीही समजण्याच्या आत चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या साखळीवर झडप घातली आणि ती जोरात ओरबाडून पोबारा केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटा अवघ्या काही सेकंदात पसार होण्यात यशस्वी झाला.
दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आता समोर आले असून, त्यामध्ये चोरट्याचा चेहरा स्पष्टपणे दिसून येत आहे. चोरट्याने अतिशय सराईतपणे ही चोरी केली असून, तो परिसरातील हालचालींवर आधीपासून लक्ष ठेवून असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित चोरट्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे सातपूर परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
या संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.