मुंबई: वरळी येथे भाजपने काढलेल्या मोर्चादरम्यान राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या महिलेच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, तिच्यावर तातडीने गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
नेमकी घटना काय?
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानापासून एनएससीआय डोमपर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामुळे वरळी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी एका आलिशान कारमधून प्रवास करणारी महिला वाहतूक कोंडीमुळे संतप्त झाली.
आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवली. "इथून चालते व्हा, गेट आऊट! तुमच्या या मोर्चामुळे शेकडो लोक अडकले आहेत," अशा शब्दांत तिने मंत्र्यांचा आणि मोर्चाचा निषेध केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला, ज्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या प्रकरणावर झेन सदावर्ते हिने संबंधित महिलेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तिचे म्हणणे आहे की:
पोलिसांचा अपमान: महिलेने केवळ लोकप्रतिनिधींचाच नाही, तर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचाही जाहीर अपमान केला. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे हा कायद्याचा भंग आहे आणि पोलिसांचा असा अपमान आपण सहन करणार नाही.
आंदोलनाचा हक्क: "सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षामुळेच आज महिलांना अधिकार मिळाले आहेत. अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरणे हा लोकशाही हक्क आहे. जर एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक कारणासाठी मोर्चा निघत असेल आणि त्यामुळे मर्सिडीजवाल्यांना ट्रॅफिकमध्ये थांबावे लागले, तर त्यात चुकीचे काहीच नाही,"असे झेनने ठामपणे सांगितले.
संबंधित महिला आलिशान गाडीतून येत होती आणि तरीही तिने पोलिसांशी गैरवर्तन केले. रस्त्यावर येऊन आवाज उठवल्याशिवाय न्याय कसा मिळणार? असा सवालही झेनने उपस्थित केला.
कायदेशीर कारवाईची मागणी
झेन सदावर्ते हिने मंत्र्यांच्या आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित महिलेवर कडक कारवाई करण्याची मागणी अर्जात नमूद केली आहे. एफआयआर दाखल करण्यासंदर्भात पोलीस आपल्याला लवकरच बोलवतील, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.
दरम्यान, वरळी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून तक्रार अर्जाची शहानिशा सुरू आहे. या घटनेमुळे आता सोशल मीडियावर आंदोलनाचे स्वातंत्र्य आणि सामान्यांची होणारी गैरसोय यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.