नवी दिल्ली: देशाच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठा आणि अनपेक्षित उलटफेर झाला आहे. आम आदमी पक्षाचे चाणक्य आणि अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. केवळ चड्ढाच नव्हे, तर 'आप'च्या एकूण १० राज्यसभा खासदारांपैकी ७ खासदारांनी एकत्र येत पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून ते भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत.
या ऐतिहासिक बंडामुळे राज्यसभेत 'आप' खिळखिळी झाली असून विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
मी चुकीच्या पक्षात असलेला योग्य माणूस' – चड्ढांचे भावूक विधान
दिल्लीत घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत राघव चड्ढा यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी बोलताना ते अत्यंत भावूक झाले होते. ते म्हणाले, "ज्या पक्षाला मी स्वतःच्या रक्ताने आणि घामाने सिंचले, तो पक्ष आता आपल्या मूळ तत्त्वांपासून आणि विचारांपासून पूर्णपणे भरकटला आहे. गेल्या काही काळापासून माझी पक्षात घुसमट होत होती. शेवटी मला जाणीव झाली की, 'I am the right man in the wrong party' (मी चुकीच्या पक्षात असलेला योग्य माणूस आहे). म्हणूनच मी आज हा कठीण निर्णय घेतला आहे".
राज्यसभेत 'ऑपरेशन कमळ'? ७ खासदारांचा समावेश
राघव चड्ढा यांनी राज्यघटनेतील तरतुदींचा आधार घेत हा मोठा गट भाजपमध्ये विलीन केला आहे. दोन-तृतीयांश (२/३) बहुमत सोबत असल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. चड्ढा यांच्यासोबत भाजपमध्ये जाणारे प्रमुख खासदार खालीलप्रमाणे आहेत:
राघव चड्ढा
संदीप पाठक (आपचे माजी संघटना सरचिटणीस)
अशोक मित्तल
हरभजन सिंग (माजी क्रिकेटपटू)
स्वाती मालीवाल
राजिंदर गुप्ता
विक्रम साहनी.
नाराजीचे नेमके कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा आणि पक्षनेतृत्वामध्ये तीव्र मतभेद सुरू होते. २ एप्रिल २०२६ रोजी 'आप'ने त्यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून तडकाफडकी हटवले होते आणि त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली होती. तसेच त्यांना संसदेत बोलण्यासाठी वेळही दिला जात नव्हता. पक्षाने त्यांच्यावर "पर्सनल पीआर"(वैयक्तिक प्रसिद्धी) केल्याचा आरोप लावला होता. या अपमानास्पद वागणुकीमुळेच चड्ढा यांनी ही मोठी बंडखोरी केल्याचे बोलले जात आहे.
अरविंद केजरीवालांना मोठा झटका
अरविंद केजरीवाल तुरुंगात असतानाच त्यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या सहकाऱ्याने अशा प्रकारे साथ सोडल्याने पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. चड्ढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत आता आपण देशाच्या विकासासाठी भाजपसोबत काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या मोठ्या राजकीय भूकंपानंतर आता दिल्ली आणि पंजाबमध्ये 'आप'चे अस्तित्व टिकवण्यासाठी केजरीवाल काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.