नाशिक: जर तुम्ही यंदा किंवा पुढच्या वर्षी लग्नाचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. धार्मिक आणि खगोलशास्त्रीय कारणांमुळे आगामी काळात विवाह इच्छुकांना मुहूर्तांच्या मोठ्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मे २०२६ नंतर लग्नाचे सनई-चौघडे थेट २०२७ च्या सुरुवातीपर्यंत शांत राहण्याची शक्यता आहे.
अधिक मासात का टाळतात विवाह?
हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणारा ‘अधिक महिना’ महत्त्वाचा मानला जातो. हा महिना भगवान विष्णूला समर्पित असतो. या काळात भौतिक सुखापेक्षा जप, तप, ध्यान आणि दान यांचं महत्त्व असतं. विवाह हा सांसारिक आनंदाशी संबंधित मानला जातो, त्यामुळे या काळात विवाह टाळले जातात. तसेच या काळात ग्रहांची स्थिती अस्थिर मानली जाते. शुभ कार्यासाठी ग्रहांचे पाठबळ मिळत नसल्याने वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
मुहूर्तांचा दुष्काळ का पडणार?
१७ मे ते १५ जून २०२६ या काळात ‘अधिक मास’ किंवा मलमास येत आहे. त्यानंतर लगेच जुलैपासून गुरु-शुक्र ग्रहांचा अस्त आणि चातुर्मासाची सुरुवात होते. विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२६ पासून ‘सिंहस्थ कुंभमेळा’ सुरू होत असल्याने महाराष्ट्र आणि विशेषकरून नाशिक परिसरात विवाह मुहूर्त वर्ज्य असतील. त्यामुळे पुढचा विवाह मुहूर्त थेट जानेवारी २०२७ मध्येच उपलब्ध असेल.
विवाह मुहूर्तांचे संपूर्ण वेळापत्रक:
२०२६ मधील शेवटच्या संधी:
मे २०२६: १, ३, ६, ७, ८, ९, १०, १३, १४ (१७ मे पासून अधिक मास सुरू)
जून २०२६: १९, २०, २२, २३, २४, २७
जुलै २०२६: १, २, ३, ४, ७, ८, ९, ११
थेट २०२७ मध्ये मिळणारे मुहूर्त:
जानेवारी २०२७: २६, २७, २९
फेब्रुवारी २०२७: १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २३, २४, २५, २७, २८
मार्च २०२७: २, ४, १०, ११, १४, २०, २४, २६, २७, २८, ३१
एप्रिल २०२७: १, २, ३
थोडक्यात काय?
ज्यांना २०२७ पर्यंत थांबायचे नाही, त्यांच्यासाठी ११ जुलै २०२६ ही लग्नाची शेवटची 'डेडलाईन' असेल. त्यानंतर सलग पाच महिने विवाह मुहूर्त नसल्याने हॉल, केटरर्स आणि बँड पथकांचे बुकिंग मिळवण्यासाठी आतापासूनच मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.