मुंबई: नाशिकमधील टीसीएस कंपनीतील 'कॉर्पोरेट जिहाद'चे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतही तसाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका १९ वर्षीय हिंदू तरुणीला अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिचा मानसिक छळ करणाऱ्या अश्रफ सिद्दिकी (२५) नावाच्या तरुणाला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी अश्रफ हा मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक २०१ च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा असल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे नेमकी घटना?
पीडित तरुणी आणि आरोपी अश्रफ हे महालक्ष्मी येथील एका खाजगी कंपनीत टेलिकॉलर म्हणून काम करत होते. २१ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या दरम्यान अश्रफने नोकरीसाठी मुलाखतीला आलेल्या मुलींचे मोबाईल नंबर बेकायदेशीरपणे मिळवले. या नंबरचा वापर करून त्याने पीडितेसह इतर ३ ते ४ हिंदू मुलींना टार्गेट केले.
त्याने व्हॉट्सॲपवर अश्लील मजकूर आणि पॉर्न व्हिडिओ पाठवून "मला हिंदू मुलीच आवडतात" असे विधान करत पीडितेवर लग्नासाठी दबाव टाकला. इतकेच नव्हे तर त्याने या तरुणीचा पाठलाग करून तिला लॉजवर येण्यासाठी धमकावल्याचेही समोर आले आहे.
राजकीय पडसाद आणि 'कॉर्पोरेट जिहाद'चा आरोप
या प्रकरणावर भाजप पदाधिकारी नितीन बनकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून याला 'कॉर्पोरेट जिहाद' असे संबोधले आहे. अशा प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. "मुलींना जाळ्यात ओढण्याचे हे प्रकार थांबले पाहिजेत. एखादी मुलगी प्रतिसाद देत नसेल तर तिला त्रास देणे ही नीच मानसिकता आहे," असे म्हणत त्यांनी पीडित मुलींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
पोलिसांची तत्पर कारवाई
पीडित तरुणीने न डगमगता वडिलांसह आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तातडीने हालचाली करत अश्रफ सिद्दिकीला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५, ७८(२), ७९ आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अजून किती मुलींना अशा प्रकारे त्रास दिला आहे, याचा अधिक तपास आग्रीपाडा पोलीस करत आहेत.