नाशिक: वाढत्या उन्हाळ्याच्या कडाक्यात चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीरात हळूहळू घाण जमा होऊ लागते. जर या घाणीवर वेळीच उपचार केले नाहीत तर पचनाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरात साचलेल्या या विषारी घटकांमुळे भविष्यात अनेक गंभीर आजार आणि विविध संसर्गाचा धोका वाढतो. म्हणूनच उन्हाळ्यात स्वतःला आजारांपासून वाचवण्यासाठी आणि डिहायड्रेशन रोखण्यासाठी काही खास फळांच्या डिटॉक्स पेयांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
अॅलोव्हेरा आणि लिंबू डिटॉक्स ड्रिंक
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि साचलेली घाण बाहेर काढण्यासाठी अॅलोव्हेरा अर्थात कोरफडीचा रस खूप प्रभावी ठरतो. कोरफड आणि लिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. कोरफडीच्या ताज्या पानातून गर काढून तो स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर मिक्सरमध्ये एक ग्लास पाणी, कोरफडीचा गर आणि लिंबाचा रस एकत्र करून ते चांगले ब्लेंड करावे. हे पेय यकृत (Liver) डिटॉक्स करण्यास आणि आतड्यांची स्वच्छता राखण्यास मदत करते, ज्यामुळे गॅस आणि ॲसिडिटीच्या तक्रारी दूर होतात.
कलिंगड आणि पुदिना रिफ्रेशर
कलिंगडामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असते, ज्यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशन रोखण्यासाठी हे फळ सर्वोत्तम मानले जाते. कलिंगडाचे छोटे तुकडे करून त्यात पुदिन्याची पाने आणि थोडे काळं मीठ टाकून ज्यूस बनवावा. हे पेय प्यायल्याने शरीरातील विषारी घटक लघवीवाटे वेगाने बाहेर पडतात. तसेच पुदिन्याच्या थंडाव्यामुळे पोटातील जळजळ शांत होते आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
संत्रे आणि आल्याचे डिटॉक्स पेय
उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत आवश्यक असते. संत्र्याचा ताजा रस काढून त्यात अगदी थोडा आल्याचा रस किंवा आल्याचा तुकडा टाकून मिक्स करावे. संत्र्यामुळे शरीराला अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात, तर आल्यामुळे पचनक्रिया अधिक गतिमान होते. हे पेय रक्त शुद्ध करण्यास आणि शरीरातील जळजळ कमी करण्यास विशेष मदत करते.
काकडी आणि अननस डिटॉक्स वॉटर
काकडी आणि अननस हे दोन्ही पचनासाठी आणि शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी वरदान मानले जातात. एका मोठ्या काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काकडीचे आणि अननसाचे काप रात्रभर किंवा काही तास भिजत ठेवावेत. उन्हाळ्यात दिवसभरात थोडे-थोडे करून हे पाणी प्यावे. यामुळे शरीरातील घाण तर बाहेर पडतेच, शिवाय त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.
पेय पिताना घ्यायची काळजी
ही सर्व डिटॉक्स पेये ताजी असतानाच प्यावीत. कोरफडीचा गर काढताना त्यातील पिवळा चिवट भाग पूर्णपणे काढून टाकावा, कारण तो पोटासाठी हानिकारक ठरू शकतो. तसेच गर्भवती महिला, लहान मुले किंवा एखाद्या विशिष्ट आजाराचे रुग्ण असलेल्या व्यक्तींनी ही पेये आपल्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.