सचिनच्या वाढदिवशी कांबळी भावूक; आचरेकरांच्या मैदानावर जाऊन दिलं अनोखं 'सरप्राईज'
सचिनच्या वाढदिवशी कांबळी भावूक; आचरेकरांच्या मैदानावर जाऊन दिलं अनोखं 'सरप्राईज'
img
Jayshri Rajesh



मुंबई: क्रिकेटचा 'देव' मानल्या जाणाऱ्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरने नुकताच त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा केला. जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, त्याचा बालपणीचा जिगरी दोस्त आणि भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज [विनोद कांबळी याने अत्यंत भावनिक आणि अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. 

सचिनला वाढदिवसाचे सरप्राईज देण्यासाठी कांबळी थेट मुंबईच्या ऐतिहासिक [शिवाजी पार्क मैदानावर पोहोचला. हे तेच मैदान आहे जिथे या दोघांनी मिळून प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या क्रिकेट प्रवासाचा पाया रचला होता. 

सचिनच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी शिवाजी पार्क मैदानावरून आपल्या जुन्या मित्राला अत्यंत आपुलकीने साद घालताना दिसत आहे. तो म्हणतो, "ऐ पार्टनर, आज सेलिब्रेशन तो बनता है! हॅपी बर्थडे, पार्टनर". त्याच्या या संवादाने जुन्या आठवणींना उजाळा दिला असून क्रिकेट चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. 

फक्त शुभेच्छा देऊन कांबळी थांबला नाही, तर त्याने या सोहळ्याचे रूपांतर एका सुंदर सामाजिक उपक्रमात केले. शिवाजी पार्कच्या खेळपट्ट्यांवर घाम गाळणाऱ्या आणि भविष्यातील 'सचिन' बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या छोट्या खेळाडूंसोबत त्याने वेळ घालवला. या चिमुरड्या खेळाडूंचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कांबळीने त्यांना आइस्क्रीम भरवून खास ट्रीट दिली. 

या खास प्रसंगी बोलताना कांबळी म्हणाला की, "माझ्यासाठी २४ एप्रिल हा नेहमीच अत्यंत महत्त्वाचा आणि खास दिवस असतो. मी दरवर्षी या दिवशी माझा पार्टनर सचिनची आवर्जून आठवण काढतो. आम्ही दोघांनी याच मैदानावर एकत्र सराव केला, वाढदिवस साजरे केले आणि इथल्या मैदानांवर आमचे वर्चस्व गाजवले. आमचे हे नाते आणि ही अतूट मैत्री कधीही तुटू शकत नाही". 

गेल्या काही काळापासून कांबळीच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली जात होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही सर्व आजारपण बाजूला सारून त्याने आपल्या मित्रासाठी शिवाजी पार्क गाठल्यामुळे त्याच्या या कृतीचे कौतुक क्रीडा विश्वातून होत आहे.

लहान मुलांसोबत आइस्क्रीम वाटून आनंद साजरा करणाऱ्या विनोद कांबळीच्या या हटके सेलिब्रेशनची बातमी सध्या सोशल मीडियापासून ते गल्लीबोळातील कट्ट्यांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group