अबब! २९ दिवसांत ४१ कोटींची रोख आणि किलोभर सोनं-चांदी;
अबब! २९ दिवसांत ४१ कोटींची रोख आणि किलोभर सोनं-चांदी; "या" मंदिरात दानाचा नवा रेकॉर्ड
img
Jayshri Rajesh



चित्तोडगड: राजस्थानमधील प्रसिद्ध कृष्णधाम श्री सांवलिया सेठ मंदिरात भक्तांनी पुन्हा एकदा श्रद्धेचा अभूतपूर्व महापूर आणला आहे. केवळ २९ दिवसांच्या कालावधीत मंदिरात तब्बल ४१ कोटी ६७ लाख ३८ हजार ५६९ रुपयांची विक्रमी देणगी जमा झाली असून, यात मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचाही समावेश आहे. एका महिन्यात मिळालेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी रक्कम असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, १८ मार्च ते १६ एप्रिल दरम्यान ही देणगी जमा झाली आहे. परंपरेनुसार कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मंदिरातील मुख्य दानपेटी (भंडार) उघडण्यात आली. या दानपेटीतून निघालेली रोख रक्कम इतकी प्रचंड होती की, मोजणी पूर्ण करण्यासाठी तब्बल ७ फेऱ्या कराव्या लागल्या. 

केवळ दानपेटीमधूनच ३३ कोटी २१ लाख ६३ हजार ५३९ रुपयांची अथांग रोकड बाहेर आली. याशिवाय, मनीऑर्डर, थेट कार्यालयात जमा झालेले दान आणि ऑनलाइन माध्यमांतून मंदिराला ८ कोटी ४५ लाख ७५ हजार ३० रुपयांचा निधी प्राप्त झाला.

विशेष म्हणजे पैशांसोबतच भक्तांनी आपल्या आराध्य देवतेला भरभरून सोने आणि चांदीही अर्पण केली आहे. मोजणीच्या अंतिम टप्प्यात ६६० ग्रॅम ५०० मिलीग्राम सोने आणि ८४ किलो ६२० ग्रॅम चांदीचे दागिने व वस्तू जमा झाल्याचे समोर आले. 

सराफा बाजारातील अंदाजानुसार, या मिळालेल्या सोन्याची किंमत साधारण १ कोटी आणि चांदीची किंमत २ कोटी रुपयांच्या घरात आहे. या संपूर्ण मोजणी प्रक्रियेत भारतीय चलनी नोटांसह अनेक परदेशी चलने आणि धनादेशही मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.

या मोजणीची संपूर्ण प्रक्रिया मंदिर मंडळाचे अध्यक्ष, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभा गौतम यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व कडक सुरक्षेत पार पडली. मोजणीच्या पारदर्शकतेसाठी बँक कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी सातत्याने तेथे तैनात होते.

सांवलिया सेठ मंदिराची ख्याती देशभरात पसरलेली आहे. अनेक व्यावसायिक आणि मोठे व्यापारी या मंदिरातील भगवान श्रीकृष्णाला आपल्या व्यवसायातील भागीदार (बिझनेस पार्टनर) मानतात. त्यांच्या श्रद्धेनुसार, व्यवसायात झालेल्या नफ्यातील काही निश्चित वाटा ते दरमहा या दरबारात अर्पण करतात आणि याच अतूट विश्वासामुळे या मंदिरात दर महिन्याला दानाचे नवनवे विक्रम प्रस्थापित होताना दिसत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group