झारखंड: झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे मुफ्फसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजटो गावात उघड्यावरील दूषित पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यामुळे २० ते २५ जणांना तीव्र विषबाधा झाली आहे.
या अत्यंत दुर्दैवी घटनेत ६ वर्षांच्या एका चिमुरड्याचा मृत्यू झाला असून १८ हून अधिक लहान मुले रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
उलटी आणि जुलाबामुळे रविवार उजाडताच प्रकृती ढासळली
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी एक फेरीवाला बजटो गावात पाणीपुरी आणि छोले विकण्यासाठी आला होता. गावातील अनेक लहान मुले आणि महिलांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला. मात्र, हे अन्न खाल्यानंतर काही तासांतच लोकांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला.
रविवारी सकाळपर्यंत परिस्थिती अधिकच हाताबाहेर गेली. विषबाधेमुळे ६ वर्षांच्या निष्पाप बालकाने प्राण गमावला, तर इतर बाधित लहान मुलांना तातडीने उपचारासाठी गिरिडीहच्या सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; अधिकारी रुग्णालयात दाखल
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गिरिडीहचे उपायुक्त रामनिवास यादव, एसडीएम श्रीकांत यशवंत आणि एसडीपीओ जितवाहन उराव यांनी परिस्थितीचा तातडीने आढावा घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली.
त्यांनी बाधित लहान मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली असून रुग्णांवर सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले आहेत. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी विशेष सतर्कता बाळगत रुग्णांवर २४ तास देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय पथके तैनात केली आहेत.
अन्न सुरक्षा विभागाकडून तपास सुरू, फेरीवाला फरार
तीव्र उन्हाळ्यात अन्न दूषित झाल्यामुळे ही गंभीर घटना घडली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. संबंधित फेरीवाल्याने विकलेल्या अन्नपदार्थांचे आणि पाण्याचे नमुने अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने गोळा केले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
घटनेनंतर तो फेरीवाला गावातून पसार झाला असून पोलीस आणि प्रशासन त्याचा कसून शोध घेत आहेत. भीषण उन्हाळ्यात बाहेरील उघड्यावरील अन्न खाणे जिवावर बेतू शकते, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.