मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा दणका देत पेटीएम पेमेंट्स बँक चा बँकिंग परवाना कायमचा रद्द केला आहे. सातत्याने होत असलेले नियमभंग आणि प्रशासकीय त्रुटी यामुळे बँकेचे कामकाज बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मध्यवर्ती बँकेने घेतला आहे. या कारवाईमुळे पेटीएमचे साम्राज्य खिळखिळे झाले असून, आज शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांहून अधिक मोठी घसरण पाहायला मिळाली.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या तरतुदींचे सतत उल्लंघन केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेला आता भारतात कोणताही बँकिंग व्यवसाय करता येणार नाही. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, बँकेचे व्यवस्थापन आणि सुरू असलेले व्यवहार हे सामान्य जनतेच्या तसेच ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहोचवणारे होते.
या बँकेला पूर्णपणे गुंडाळण्यासाठी आता आरबीआय थेट उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. या मोठ्या कारवाईच्या वृत्तानंतर गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि त्यांनी भराभर शेअर्स विकायला सुरुवात केली, ज्यामुळे पेटीएमचा शेअर ₹१,१४७ वरून थेट ₹१,०५१ पर्यंत खाली घसरला.
या संपूर्ण पडझडीनंतर पेटीएम कंपनीने आपल्या लाखो ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
कंपनीने स्पष्ट केले आहे की, सामान्यांच्या दैनंदिन डिजिटल व्यवहारांवर याचा कोणताही विपरित परिणाम होणार नाही. तुमची पेटीएम ॲप मधील यूपीआय (UPI) सेवा, क्युआर कोड पेमेंट व्यवस्था पूर्वीप्रमाणेच इतर भागीदार बँकांच्या मदतीने सुरळीत सुरू राहतील.
त्याचप्रमाणे, ज्या ग्राहकांचे पैसे बँकेत आधीपासून जमा आहेत, त्यांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. आरबीआयने आपल्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, बँकेकडे सर्व ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे परत करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे आणि ग्राहक केव्हाही स्वतःचे पैसे काढून घेऊ शकतात. मोठ्या बाजार तज्ज्ञांच्या मते, हा घसरलेला शेअर पुढे जाऊन पुन्हा स्थिर होण्याची शक्यता आहे.