पुणे :पुणे रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस वाढणारी प्रवाशांची गर्दी आणि गाड्यांचा वाढता भार लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने स्टेशनच्या विस्तारीकरणाचा एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या महाप्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाने तब्बल ४४.०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या विस्तारामुळे पुणे स्टेशनवर सध्या असलेल्या ६ प्लॅटफॉर्मची संख्या आता १२ वर पोहोचणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पाहणीनंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे
'आयलँड प्लॅटफॉर्म' संकल्पना
रेल्वेच्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारे ६ नवीन फलाट हे 'आयलँड प्लॅटफॉर्म' (Island Platform) स्वरूपाचे असणार आहेत. याचा सर्वात मोठा फायदा असा की, या प्रकारच्या एकाच प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूंना रेल्वे गाड्या उभ्या राहू शकतील. कमी जागेत अधिक गाड्यांचे संचालन करणे यामुळे सहज शक्य होणार आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि टप्पे:
क्षमता होणार दुप्पट: सध्या स्टेशनवर ६ प्लॅटफॉर्म कार्यरत आहेत. नव्या ६ फलाटांमुळे गाड्यांची कोंडी फुटण्यास मदत होईल.
दोन टप्प्यांत काम: पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक ११ आणि १२ चे बांधकाम सुरू झाले आहे. यासाठी १५.३२ कोटींचा खर्च अपेक्षित असून पुढील २ महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
२४ डब्यांची क्षमता: हे नवीन प्लॅटफॉर्म ६०० ते ७५० मीटर लांबीचे असतील. त्यामुळे लांब पल्ल्याच्या २४ डब्यांच्या गाड्याही येथे सहज उभ्या राहू शकतील.
प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा
नवीन फलाट उभारताना केवळ गाड्यांचे संचलनच नाही, तर प्रवासी सुविधांवरही मोठा भर दिला जात आहे. यामध्ये ४०० मीटर लांबीचे कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म (शेड), आधुनिक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सर्व फलाटांना जोडणारे पादचारी पूल (FOB) उभारण्यात येणार आहेत.
'आउटर'ची समस्या सुटणार
सध्या फलाट रिकामे नसल्यामुळे अनेक गाड्यांना पुणे स्थानकाच्या बाहेर तासनतास थांबावे लागते (आउटरवर), ज्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. परंतु स्थानकाची क्षमता दुप्पट झाल्यामुळे गाड्या थेट प्लॅटफॉर्मवर येऊ शकतील आणि प्रवाशांचा वेळ वाचेल.