मुंबई: महाराष्ट्रात सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावरून मोठा वाद पेटला आहे. या निर्णयाच्या विरोधात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी ४ मे रोजी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.
या संपाचा थेट फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता असतानाच, आता मराठमोळा अभिनेता आणि 'बिग बॉस' फेम शिव ठाकरे याने मराठी अस्मितेच्या मुद्द्याला थेट कृतीतून पाठिंबा दिला आहे. त्याने संपाच्या दिवशी आपली स्वतःची आलिशान कार टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
राज्यातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणे, वाचणे आणि लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या निर्णयाला आणि परवाने रद्द करण्याच्या कारवाईला विरोध करत अमराठी चालक संघटनांनी ४ मे रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
शिव ठाकरेची 'अनोखी' टॅक्सी!
संपाच्या दिवशी चाकरमान्यांचे आणि सामान्य मराठी जनतेचे हाल होऊ नयेत, म्हणून शिव ठाकरेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठ्या मोहिमेची घोषणा केली आहे.
स्वतःची गाडी रस्त्यावर उतरवणार: संपाच्या दिवशी शिव ठाकरे त्याची स्वतःची आलिशान पांढऱ्या रंगाची कार (टाटा हॅरिअर - MH 27 DK 0909) सामान्य जनतेच्या प्रवासासाठी टॅक्सी म्हणून उपलब्ध करून देणार आहे.
कशी ओळखायची ही गाडी?
शिवने सांगितले की, प्रवाशांना ही गाडी लांबूनच ओळखता यावी म्हणून गाडीच्या मागे 'जय महाराष्ट्र' अशी पाटी लावण्यात येईल.
फेटाधारी चालक: विशेष म्हणजे या गाडीच्या ड्रायव्हर सीटवर 'भगवा फेटा' परिधान केलेला अस्सल मराठी माणूस (ड्रायव्हर) बसलेला असेल.
हक्काने गाडी थांबवा: प्रवासात अडचण आल्यास जनतेने ही गाडी कुठेही दिसली तरी हात दाखवून हक्काने थांबवावी, असे आवाहन त्याने केले आहे.
"मराठी माणूस थांबता कामा नये!"
शिव ठाकरेने आपल्या पोस्टमध्ये खणखणीत संदेश देत लिहिले आहे की, "काहीही हो... मराठी माणूस थांबता कामा नये!" मराठी भाषेची सक्ती आणि परप्रांतीय चालकांचा संप या पार्श्वभूमीवर शिव ठाकरेने दिलेले हे उत्तर सध्या सोशल मीडियावर वादळासारखे व्हायरल होत आहे. त्याच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून आणि विशेषतः मराठी प्रेमींकडून प्रचंड कौतुक केले जात आहे.
अमराठी टॅक्सी चालकांच्या दादागिरीला आणि संपाला भीक न घालता मैदानात उतरणाऱ्या शिव ठाकरेच्या या पुढाकारामुळे ४ मे रोजीच्या आंदोलनाला आता एक वेगळेच वळण लागल्याचे दिसून येत आहे.