एलपीजी LPG सिलिंडर ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर बुक करताना अनेक ग्राहकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु आता ग्राहकांना आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आता भारत पेट्रोलियम अंतर्गत येणाऱ्या भारत गॅसने अनेक भागांमध्ये बंद करण्यात आलेली एलपीजी होम डिलिव्हरी सेवा पुन्हा सुरू केली आहे. ग्राहकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीनंतर ही सेवा पुन्हा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी काही भागांमध्ये एलपीजी सिलेंडरची घरपोच सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांना एजन्सीकडे जाऊन सिलेंडर घ्यावा लागत होता. आता मात्र अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दुर्गम भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, एलपीजी सिलेंडरच्या काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नियम अधिक कठोर केले आहेत. सिलेंडर बुकिंगपासून ते डिलिव्हरीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया आता डिजिटल आणि पडताळणीवर आधारित करण्यात आली आहे. विशेषतः ओटीपी प्रणाली अनिवार्य करण्यात आल्याने आता ग्राहकांना अधिक काळजीपूर्वक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
दरम्यान, नवीन नियमानुसार, सिलेंडर डिलिव्हरीवेळी ग्राहकांकडे ओटीपी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओटीपीची पडताळणी झाल्यानंतरच ग्राहकाला गॅस सिलेंडर दिला जाणार आहे. सरकारच्या मते, यामुळे बनावट बुकिंग आणि काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.